- “स्विमिंग” आणि “हॉर्स रायडिंग” चे विशेष आकर्षण
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प बेळगाव येथे ‘समर कॅम्प’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एसएमसी कमिटीचे सदस्य अरविंद संगोळ्ळी यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या नियोजनाखाली हे शिबिर प्रगतीपथावर आहे.

यंदाच्या शिबिरात हॉर्स रायडिंग हे मुख्य आकर्षण ठरत असून, घोड्यावर स्वार होऊन रपेट मारताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या साहसी खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होत आहे. तसेच, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर स्विमिंग या उपक्रमाचाही विद्यार्थी मनमुराद आनंद लुटत आहेत.
केवळ खेळच नव्हे, तर मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी योगासने, तायक्वांदो, संगीत, नृत्य आणि आर्ट अँड क्राफ्ट यांसारख्या विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत करण्यासाठी ‘बेसिक क्लासेस’चेही आयोजन करण्यात आले आहे.
शाळेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले असून, मुलांच्या आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे शिबिर २४ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.








