बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या बालवाटिकेचा पदवीदान समारंभ (ग्रॅज्युएशन डे) नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यात यु.के.जी. मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस्. पाटील, सचिव प्रो. नितीन घोरपडे, प्राचार्या सौ. सोनाली कंग्राळकर, बालवाटिका विभागाच्या को-ऑर्डिनेटर सौ. सौदामिनी सावंत आणि प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. युगंधरा काळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य सौ. सोनाली कंग्राळकर यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रमुख पाहुण्या डॉ. युगंधरा काळे यांनी ‘प्रभावी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना पालकांना मोलाचा सल्ला दिला. “पालकांनी अत्यंत जागरूकतेने आपले पालकत्व निभावले पाहिजे. मुलांच्या वाढीच्या काळात त्यांच्या भावनिक आणि शारीरिक गरजा समजून घेणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस्. पाटील यांनी आजच्या धावपळीच्या युगात पालकांनी मुलांसाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे आणि त्यांना मोठ्यांचा आदर करण्यासारखे संस्कार दिले पाहिजेत, असे आवाहन केले.

या सोहळ्यात बालवाटिकेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागतगीत आणि नृत्य सादर केले. अद्विका कुरले, सारा चव्हाण, श्रीनिका पाटील, साईश पाटील आणि अनिशा पाटील या चिमुकल्यांनी आपले विचार व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. बालवाटिका विभागाच्या शिक्षिका सौ. अनिता भोसले व सौ. पौर्णिमा पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यु.के.जी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वाटण्यात आली. आभार प्रदर्शन सौ. सौजन्या सावंत यांनी केले. या सोहळ्याला पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.