बेळगाव : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये आज, ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. ‘विद्येविना मती गेली…’ या त्यांच्या अजरामर विचारांचा जागर करत शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या थोर समाजसुधारकाला अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील आणि उपप्राचार्या श्रीमती. सोनाली कंग्राळकर यांच्याहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शिक्षिका आरती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महात्मा फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला, तर शिक्षिका अक्षता, राशी पाटील व प्रतिज्ञा हेब्बाळकर यांनी सुश्राव्य प्रार्थनागीत सादर केले.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे कुमार श्रवण बेन्नाळकर याने केलेली महात्मा ज्योतिराव फुलेंची हुबेहूब वेषभूषा आणि कुमारी पल्लवी पाखरे हिने सादर केलेली मराठी अफर्मेशन्स. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून फुलेंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर कुमारी कृतिया जांबोटकर हिने स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी आपल्या विशेष संदेशात विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंच्या जिद्दीचा आणि ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. इयत्ता १० वी चा विद्यार्थी आदिनाथ पाटील याने म. फुले यांचे विचार मांडले तर अभिजित मोरे याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीत आणि नाडगीताने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमामुळे शालेय वातावरणात वैचारिक आणि सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले होते.








