- बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव / प्रतिनिधी
माध्यम क्षेत्रात अनेक बदल घडत असून डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता सोपी झाली असली तरीही, पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे. आजच्या युगातील पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी बोलताना केले. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
आज शुक्रवारी रविवार पेठ येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रवीण टाके यांच्यासह, पुणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर देशपांडे तसेच कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक रणजीत पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुढे बोलताना टाके म्हणाले, भावी काळात पत्रकारांना जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे. बेळगाव सीमा भागातील पत्रकार अत्यंत तळमळीने कार्य करत आहेत. सीमा भागातील पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. मुख्यमंत्री स्वतः जातीने पत्रकारांच्या मागण्यांचा आस्थेने विचार करतात. सीमाभागातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात आपण जातीने शासन दरबारी पाठपुरावा करून असे आश्वासनही टाके यांनी यावेळी दिले.
समीर देशपांडे म्हणाले , कोल्हापुरातील पत्रकारांनी बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेची बाजू लावून धरण्याचे काम सातत्याने केले.महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा प्रश्नाचा जाब विचारण्याचे काम ही करत आहेत.बेळगाव सीमा भागातील मराठी जनता आणि पत्रकार जे सोसत आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे. बेळगावात वृत्तपत्र चालविणे अत्यंत कठीण कार्य आहे.सीमाभागात पत्रकारिता करणे आव्हानात्मक आहे. कोरोना नंतर माध्यमांची स्थिती बिकट बनली आहे. पत्रकारांचे प्रश्नही दूर राहिले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रणजीत पवार यांनी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी जाहीर झालेल्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास हुद्दार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, प्रा. आनंद आपटेकर यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.