कोल्हापूर / प्रतिनिधी

श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे ४०० पोलीस आणि ४०० होमगार्ड तैनात करण्यात आले असून शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन व जुने एस.टी. स्टँड परिसर, तोरणाई कडा, पिराचा कडा, एमटीडीसी परिसर, सेंट्रल प्लाझा, ग्रामपंचायत परिसर, यमाई मंदिर परिसर, निलगिरी बाग, दानेवाडी फाटा आदी ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान वाहतुकीवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहने, मालवाहतूक ट्रक, रिक्षा आणि ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास बंदी असेल. तसेच मुख्य यात्रेच्या दिवशी १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांनाही काही मार्गांवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.