- खासदार जगदीश शेट्टर यांची नैर्ऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील नवीन रेल्वेमार्गांसोबत उड्डाणपुलांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी नैर्ऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तसेच अधिकाऱ्यांना दिली. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये रेल्वेसंदर्भातील विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेत रेल्वे विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळण्याची सूचना त्यांनी केली.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम धारवाडनजीकची, १६ जागा एकर जागा वगळता उर्वरित पूर्ण झाले आहे. राज्य सरकारकडून जमीन हस्तांतरित झाल्यानंतर लवकरच या कामाच्या निविदा मागविल्या जाणार आहेत. लोकापूर, रामदुर्ग, सौंदत्ती, धारवाड या रेल्वेमार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षणाचे काम केले असून आवश्यक त्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठविण्यात आल्याचे रेल्वे अभियंत्यांनी खासदारांना सांगितले. या रेल्वेमार्गामुळे रामदुर्ग येथील शबरी कुंड, सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मादेवी तसेच शिरसंगी येथील कालिकादेवी मंदिराला भाविकांना ये-जा करणे सोयीचे होणार असल्याने हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.
बेळगाव शहरातील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला येणाऱ्या अडचणींविषयी खासदारांनी माहिती घेतली. वाहनांचा मार्ग बदलण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले. आपण प्रत्यक्ष या कामाची पाहणी करून लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन रेल्वे दिले. बेळगाव व्यवस्थापकांनी रेल्वेस्थानकाचा प्रधानमंत्री अमृत स्टेशन योजनेमध्ये समावेश झाला असला तरी येथील विकासकामे सुरू असल्याबद्दल संथगतीने खासदारांनी नाराजी व्यक्त केली. बेळगाव येथील फूट ओव्हरब्रिज तसेच घटप्रभा रेल्वेस्थानकातील फूट ओव्हरब्रिजचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी नैर्ऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल शरण माथुर, प्रमोद जोशी, चिदानंद धीमशेट्टी, गुरुपाल कल्ली, इराण्णा चंदरगी यासह इतर उपस्थित होते.
- विविध मार्गांवर गाड्या सुरू करण्याची मागणी :
बेळगावमधून नवीन रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव खासदारांनी नैर्ऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवला. बेळगाव-मनगुरू, बेळगाव – मडगाव, उडुपी–मंगळूर, बेळगाव-चेन्नई व्हाया तिरुपती, बेळगाव-बेंगळूर अशा गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावमधून सकाळी ६ वाजता सुटावी व हुबळी- पुणे वंदे भारत दैनंदिन करावी, अशी सूचना करण्यात आली.








