- वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय : नागरिकांना दिलासा
बेळगाव / प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्ग अखेर नागरिकांच्या वापरात येण्याच्या मार्गावर आहे. दीर्घकाळ धूळ खात पडलेल्या या मार्गाला कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, प्रवेश सुलभ करण्यासाठी लोखंडी पायऱ्या व पर्यायी व्यवस्था उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुमारे १.५ कोटी रुपयांच्या खर्चातून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणी, नियोजनाचा अभाव आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हा मार्ग अनेक वर्षे बंदच राहिला. पावसाचे पाणी साचून तो निरुपयोगी ठरला होता, त्यामुळे महानगरपालिकेला वेळोवेळी पाणी उपसणी व स्वच्छतेसाठी अतिरिक्त खर्चही करावा लागला.
दरम्यान, न्यायालय परिसरासमोर प्रस्तावित फ्लायओव्हरच्या बांधकामामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने भुयारी मार्गाला पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लायओव्हरच्या कामकाजादरम्यान हा मार्ग महत्त्वाचा ठरणार असून नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
सध्या प्रवेशासाठी लोखंडी पायऱ्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा भुयारी मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे दीड कोटी रुपयांच्या खर्चाचे अखेर सार्थक होऊन जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालय परिसरातील वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.








