- विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार
- महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश ; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांपैकी अभिनय सम्राट आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनाही राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्री व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे – देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्याआधी अशोक सराफ एएनआयशी बोलताना म्हणाले की, “ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशाप्रकारे सन्मान होणे ही एक मोठी बाब आहे. हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे. मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आले, म्हणजे मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केले आहे.”