बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन,ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रगती व विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन किर्लोस्कर रोड,समादेवी मंदिर, राणी चन्नम्मा सर्कल,चव्हाट गल्ली,खडे बाजार, गणपत गल्ली येथून मारुती गल्ली मारुती मंदिर या ठिकाणी तिची सांगता होणार आहे.

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या १०३ व्या जयंती निमित्त ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ या घोषवाक्याखाली विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ‘राष्ट्र हाच देव’ अशी शिकवण देणारी जीवनविद्या आपल्या राष्ट्राप्रती नागरिकांच्या मनात आदर,प्रेम,कर्तव्य भावना निर्माण करते व राष्ट्र हेच सर्वतोपरी असून राष्ट्राची प्रगती व त्याचे रक्षण हाच भारतातील प्रत्येक नागरिकाचा राष्ट्रधर्म असला पाहिजे हे ठासून सांगते.म्हणून हे तत्वज्ञान घराघरात गेलं पाहिजे यासाठी या विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या विश्वप्रार्थना रॅलीचे विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे या रॅलीचे आकर्षण असणार आहे.जीवनविद्या मिशनची अनेक उपकेंद्रे यात विविध जीवंत देखावे सादर करणार आहेत.

समस्त बेळगाव व परिसरातील नागरिकांनी या विश्वप्रार्थना रॅलीमध्ये सहभागी होऊन राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.