• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश

बेळगाव / प्रतिनिधी

जन्म व मृत्यू नोंदी ही प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची शासकीय कागदपत्रे असून, त्यांच्या नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची चूक किंवा त्रुटी राहू नये. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक पद्धतीने पार पाडली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.

बुधवारी (१४ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा जन्म व मृत्यू नोंदणी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीच्या कामात १०० टक्के प्रगती साधण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जन्म व मृत्यू नोंदी सुरक्षित ठेवणे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की, नोंदणीच्या वेळी सर्व माहिती अचूकपणे संगणकीकृत केली पाहिजे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे गरजेचे असून, यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नोंदणीसाठी जमा होणारे शुल्क नियमितपणे शासनाकडे जमा करण्यात यावे. मृत्यू नोंदी करताना आवश्यक सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी करूनच नोंदणी करावी, तसेच जन्म व मृत्यू नोंदी व्यवस्थित जतन करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या नागरी नोंदणी प्रणाली समन्वय समित्यांच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. कोणत्याही कारणास्तव जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत विलंब होता कामा नये, असे स्पष्ट आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्हा जनगणना अधिकारी रेखा शेट्टर यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात एकूण १,४७३ नोंदणी युनिट कार्यरत असून, त्यापैकी १,४०२ ग्रामीण भागात तर ७१ शहरी भागात आहेत. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यात ७५,८७९ जन्म नोंदी आणि ४१,३४७ मृत्यू नोंदी नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, तहसीलदार बसवराज नगराल, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच शहरी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.