• हळदीकुंकू, सत्कार व विविध उपक्रमांनी रंगला सोहळा

मण्णूर : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन आणि हळदीकुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना विशेष अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल. के. कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती मातेस पुष्पांजली बेळगावच्या माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर यांनी अर्पण केली, तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला संचालक मंडळाच्या हस्ते झाले. यानंतर सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात एल. के. कालकुंद्री यांनी सहकारी संस्था ही कोणत्याही व्यक्तीची नसून ती सर्व सभासदांची असते, विश्वास हा सहकाराचा कणा आहे आणि सामाजिक बांधिलकीतूनच संस्थेचे कार्य सुरू असल्याचे नमूद केले. व्यवस्थापक महेश काकतकर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा व कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुण्या सौ. रेणू किल्लेकर यांनी महिलांना स्वयंपूर्णतेसाठी स्वतंत्र उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते अनिल चौधरी सर यांनी महिलांनी जीवनातील अडचणींना समर्थपणे सामोरे जावे, मुलांना स्वावलंबनाचे व संस्कारांचे धडे द्यावेत, असे मार्गदर्शन केले. अल्पावधीतच संस्थेने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी फौंडेशनमार्फत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. अग्निवीरमध्ये भरती झालेल्या युवक-युवतींचा तसेच गावातील पदवीधर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, एम. बी. सांबारेकर, रामा चौगुले, तानाजी तरळे, आनंद बाळेकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर तसेच कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर आणि अ वर्ग सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नावगेकर टीचर यांनी केले, तर व्यवस्थापक महेश काकतकर यांनी आभार मानले.