- बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- बनावट कागदपत्रांद्वारे वडिलोपार्जित जमिनी हडपल्याचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
बनावट कागदपत्रांच्या आधारे ब्राह्मण समाजाच्या वडिलोपार्जित जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टने केला आहे. या कथित जमीन घोटाळ्यातील भूमाफिया तसेच त्यांना साथ देणाऱ्या उपनिबंधकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे आणि उपाध्यक्ष भरत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निवेदन दिले. बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या सर्व नोंदणी व्यवहारांची तपासणी करून संबंधित जमिनी मूळ हक्कदारांना परत द्याव्यात आणि पीडित कुटुंबांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बेळगाव शहरासह खानापूर आणि ग्रामीण भागात संघटित टोळ्यांकडून मृत व्यक्तींना कागदोपत्री जिवंत दाखवणे, बनावट हक्कपत्रे तयार करणे आणि त्याद्वारे जमिनींचे हस्तांतरण करणे अशा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपनिबंधक कार्यालयात आवश्यक पडताळणी न करता नोंदणी प्रक्रियेची पूर्तता केल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय अशा प्रकारची नोंदणी शक्य नसल्याचा आरोप उपाध्यक्ष भरत देशपांडे यांनी केला. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
निवेदन सादर करताना खजिनदार रमेश कुलकर्णी, संयुक्त सचिव विलास जोशी, अनुश्री देशपांडे, बी. आर. पाटील, जी. डी. जोशी, अशोक देशपांडे यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








