• ढोर समाजसेवा संघाची कठोर भूमिका

बेळगाव : टिळकवाडीतील शुक्रवार पेठ परिसरात राहणाऱ्या ढोर समाजातील काही कुटुंबांना मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्कॉन संस्थेने आर्थिक व अन्य प्रभावाचा वापर करून ही कारवाई केल्याचा दावा जय भीम भारतीय हिंदू ढोर समाजसेवा संघ यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या घटनेमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संबंधितांवर २४ तासांच्या आत एफआयआर दाखल करून गुन्हा नोंदवावा, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय घराबाहेर काढण्यात आलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना केंद्रातील जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही भूमिका मांडण्यात आली.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत मध्यरात्री त्यांना घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून संबंधितांवर अजामीनपात्र वॉरंट काढावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

इस्कॉनच्या या कृतीमुळे मानवाधिकारांचा भंग झाल्याचा आरोप संघटनेने केला असून, २४ तासांच्या आत गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.