• पोलिस आयुक्त भूषण बोरसे

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील हिंडलगा कारागृहाबाहेरून मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ फेकल्याचा आरोप प्रसारमाध्यमांतून झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तारीख व वेळेची खातरजमा सुरू आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या कॅमेऱ्यातून आणि कोणत्या दिवशी चित्रीत करण्यात आला, याची स्पष्टता आल्यानंतर सविस्तर तपास केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या केआयएसएफचे कर्मचारी कारागृहाच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. व्हिडिओचे बारकाईने परीक्षण झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

याशिवाय कारागृह परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येणार असून, ग्रामीण पोलिस तसेच केआयएसएफ कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले.