बेळगाव / प्रतिनिधी
ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथि निमित्त “घर माझे चंद्रमौळी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत कुटुंबीयांच्या पुढाकाराने आणि आर पार ऑनलाईनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हिंदवाडी येथील आयएमईआर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे सादरीकरण सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूलकर आणि सुप्रसिद्ध लेखिका तसेच निवेदिका मुग्धा गोडबोले करणार आहेत. कविता, ललित लेख व गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. शालांत परिक्षेत सीमा भागात मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीनी व तिच्या शिक्षकांना दिला जाणारा माझी मराठी प्रतिष्ठानचा इंदिरा संत पुरस्कार ही या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांना खुला आहे तरी रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संत कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

