कंग्राळी खुर्द / वार्ताहर

देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यांत निवृत्त होणार असतानाच आलेल्या या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचा २ फेब्रुवारी रोजी हरियाणातील अंबाला येथे कर्तव्य बजावत असताना भीषण वाहन अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांचे पार्थिव बेळगावच्या सांबरा विमानतळावर आणण्यात आले. यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी कंग्राळी खुर्द येथे आणण्यात आले.

गावातील स्थानिक मराठी शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार संजय पाटील, लष्करी अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील हजारो नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत लष्करी वरिष्ठ अधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत हवेत तीन फैरी झाडून हुतात्मा जवानाला सलामी देण्यात आली. यानंतर राष्ट्रध्वज अत्यंत भावनिक वातावरणात त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करण्यात आला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा जवानाचे वडील आणि त्यांच्या मुलांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

जगदीश शिंदे हे अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेले होते. वडिलांनी मजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांनीही सैन्यात भरती होऊन देशसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. २४ वर्षे निष्ठेने सैन्यदलात सेवा बजावलेल्या जगदीश शिंदे यांना केवळ दोन महिन्यांत निवृत्ती मिळणार होती. मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने संपूर्ण गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.