- विनय कदम यांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
हिंदू समाजाची एकजूट, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक अस्मिता अधिक बळकट करण्यासाठी येत्या रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कलमेश्वर मंदिर, हिंडलगा (बॉक्साईड रोड) येथील पटांगणात हिंदू धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनय विलास कदम यांनी केले आहे.
या संमेलनात माता-भगिनी, युवक, वृद्ध अशा सर्व घटकांचा सहभाग अपेक्षित असून, हिंदू समाजाने आपले राष्ट्रप्रेम, अखंड भारताची भावना आणि सांस्कृतिक मूल्ये एकत्रितपणे व्यक्त करावीत, असे कदम यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक ठरत असल्याने, त्या विचारातून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
हिंदू समाज एकत्र आला तरच समाजहिताचे, राष्ट्रहिताचे विचार प्रभावीपणे पुढे नेता येतील. त्यामुळे सर्वांनी ८ फेब्रुवारी रोजी हिंडलगा येथे एकत्र येऊन हिंदू धर्म संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.








