- पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा बेळगावकरांना दिलासा
बेळगाव / प्रतिनिधी
भीषण उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या ताणाखाली असलेल्या बेळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. हिडकल जलाशयातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ३० मार्चपासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री जारकीहोळी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाई कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर घटप्रभा नदीत ३० मार्चपासून पाणी सोडले जाणार आहे. या पावल्यामुळे नदीकाठच्या शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल.
याशिवाय, ७ एप्रिलपासून डाव्या आणि उजव्या कालव्यांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साठवलेले हे पाणी आता शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले जाणार आहे. उन्हाळ्याच्या दाहकतेच्या पार्श्वभूमीवर मंत्री जारकीहोळी यांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.








