• पालकमंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव / प्रतिनिधी

नेहरुनगर, बेळगाव येथे हेस्कॉमच्या नूतन अर्बन डिव्हिजन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते झाले. या नवीन कार्यालयामुळे शहरातील वीज विभाग अधिक सक्षम होणार असून नागरिकांना कामे जलद गतीने व सुलभतेने करता येणार आहेत.

यावेळी बोलताना पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले की, “नवीन कार्यालय अत्याधुनिक सुविधा असलेले असून कोणतेही काम रखडणार नाही, याची काळजी अधिकार्‍यांनी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. नागरिकांना दर्जेदार व जलद सेवा देण्यावर भर द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ होते. व्यासपीठावर वायव्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, एच. एम. रेवण्णा, विनय नावलगट्टी, विभागीय मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे, शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नवीन कार्यालयामुळे हेस्कॉमच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.