बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नदीपात्र तुडुंब भरल्याने शेतात पाणी शिरले असून उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सौंदत्ती तालुक्यातील चिक्क उळ्ळीगेरी गावातील शेतकरी उमेश पुजार यांच्या तब्बल आठ एकर शेतीत उडदाचे पीक लावले होते. परंतु अखंड पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असून उडदाचे पीक वाहून गेले आहे. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही मदत किंवा पंचनाम्याची प्रक्रिया सुरू नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिरेउळ्ळीगेरी, चिक्क उळ्ळीगेरी आणि इनामहोंगल परिसरातून वाहणाऱ्या नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली असून, अन्यथा आगामी हंगाम उभा करणे कठीण होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.