- अल्पवयीन मुलगी जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील हलगा गावात वीज खांब हटवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणात वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पल्लवी तळवार या अल्पवयीन मुलीला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.
बस्तवाड-हलगा येथील रहिवासी अरुण तळवार यांच्या घरासमोरील वीज खांब हलवण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपी नागप्पा तळवार आणि पुंडलिक कोलकार यांनी अरुण तळवार यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पल्लवी हिला आरोपींनी कानावर व कानशिलात मारहाण केल्याने ती जखमी झाली.
जखमी पल्लवीला तातडीने बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत शशिकला तळवार आणि संदीप तळवार यांनी अरुण तळवार यांच्या दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अरुण तळवार यांच्या तक्रारीवरून हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गावात किरकोळ कारणांवरून वाढत्या वादांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.








