बेळगाव / प्रतिनिधी

वर्षभरातील अत्यंत शुभ अशा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडवा सणाचा प्रचंड उत्साह आहे. हिंदू नववर्षाचा शुभारंभाचा दिवस असलेल्या या सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरभरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने उद्घाटन सोहळे आणि नवकार्यारंभाचे पडघम वाजत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर नटूनथटून पारंपरिक वेषामध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बेळगाव नगरी सज्ज झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि उपनगरी भागांमध्ये पाडव्याचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्याच्या भव्य शोभा यात्रेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

  • उद्या सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर उभारा गुढी

या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या दिनी उद्या गुरुवार दि. १९ सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभारावी. सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून गुढी उतरवून ठेवावी, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. गुरुवारी गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जाणार असून, सणानिमित्त घरोघरी तयारीला सुरुवात झाली आहे. नवीन शके १९४८ या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढी उभारून, कालगणना तोरण लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून संवत्सर आरंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरीही पूजा करून गुढी उभी करावी, गुढीपूजनाकरिता वेगळा असा विधी नाही. गुढी उभी करणे, हे मांगल्याचे प्रतीक आहे, असे दाते यांनी सांगितले.