बेळगाव / प्रतिनिधी

मथुरेमध्ये गोरक्षक चंद्रशेखर स्वामी यांची हत्या झाल्याचा निषेध व्यक्त करत, बेळगावमधील कामधेनु अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. संस्थेने आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.

मथुरेत २१ मार्च रोजी अवैध गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वामींना तस्करांनी वाहनाखाली चिरडून ठार केले. या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमधील गोरक्षक निलेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. त्यांनी म्हटले की, गोमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वामींची अशा अमानवी कृत्याने हत्या होणे संपूर्ण देशासाठी धक्का आहे.

निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून स्वामींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. या निवेदनाची प्रत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे. गोरक्षकांवर होणारे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे निलेश यांनी स्पष्ट केले.