• हाऊस लिस्टिंगमध्ये शिक्षक अडकले
  • महानगरपालिकेसमोर नवा पेच

बेळगाव : जनगणना हाऊस लिस्टिंगच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी प्रभाग सीमांवरून वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. गुगल मॅप लेआउटच्या आधारे पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सीमांबाबत प्रत्यक्ष क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण होत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

काही भागांमध्ये दोन प्रभागांच्या सीमांवरून शिक्षकांमध्ये वादावादीच्या घटना घडत असल्याची माहिती मिळाली आहे. या समस्यांवर स्पष्ट निर्णय घेण्यात महापालिका अद्याप अपयशी ठरल्याचे चित्र आहे. दरम्यान, चार्ज अधिकारी स्वतः थेट हस्तक्षेप न करता बिल कलेक्टरमार्फत सीमावाद सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.

सीमांबाबत स्पष्टता नसल्यामुळे घरांची नोंदणी करताना शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणत्या प्रभागात नोंद करायची याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी काम थांबण्याची वेळ येत आहे.

वार्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र काम वेळेत पूर्ण करण्याचा दबाव कायम असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व गोंधळामुळे जनगणनेच्या हाऊस लिस्टिंग प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने सीमावाद सोडवून स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.