• गवळी समाजासह विविध संघटनांची बेळगावात तीव्र निदर्शने
  • पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून सादर केले निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

मालमत्तेच्या वादातून हत्या झालेल्या गीता गवळी यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बेळगावात गवळी समाजासह विविध संघटनांनी तीव्र निदर्शने केली. तसेच पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली.

मंगळवारी टिळकवाडी गवळी गल्ली येथील रहिवासी गीता गवळी यांच्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवावी आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत बेळगावमध्ये विविध संघटनांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.

यावेळी खून झालेल्या गीता गवळीच्या मुलीने सांगितले की,आईने मालमत्तेवर कर्ज घेतले होते. त्यामुळे माझे काका गणेश गवळी आईला पैशासाठी त्रास देत होते. त्याच मुद्द्यावरून आज दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. यानंतर त्यांनी माझ्या आईवर चाकूने वार केले आणि ते पळून गेले. त्यांचे कुटुंब एक दिवस आधीचं दुसरीकडे गेले होते. ही पूर्वनियोजित हत्या होती. तेव्हा काका गणेश गवळी, काकी सविता गवळी, आदित्य गवळी, स्मिता गवळी, विजेता गवळी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिने केली. तसेच हत्येतील आरोपींनी फोन करून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला.

गीताने गणेशच्या घरावर कर्ज घेतले होते. जर तिने ८ लाखांचे कर्ज फेडले नाही तर बँक घर जप्त करणार होती. या संदर्भात, गणेश गवळी त्याची वहिनी गीता गवळी हिला पैशासाठी त्रास देत होता. गीता गवळी हिने पैसे दिले नाहीत म्हणून तिची हत्या करण्यात आली आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे संपूर्ण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी गवळी समाजातील नेत्यांनी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

निवेदन स्वीकारून पोलीस उपायुक्त नारायण बरमणी म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस प्रशासन कोणताही संकोच न करता आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करेल आणि पीडित कुटुंबातील सदस्यांना संरक्षण देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बेळगावातील गवळी समाजासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.