• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे नागरिकांना आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. जिल्ह्यात घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युद्धपरिस्थितीमुळे गॅसची टंचाई भासत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्या तरी त्या आधारहीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशभरात एलपीजी गॅसचे उत्पादन आणि बॉटलिंग वाढवण्यात आले असून पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातही गॅसची कमतरता भासण्याचे कोणतेही कारण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भीतीपोटी नागरिकांनी अतिरिक्त सिलिंडर साठवून ठेवू नयेत, असेही त्यांनी आवाहन केले. अलीकडे आयव्हीआरएस सेवा किंवा मिस्ड कॉलद्वारे नियोजित वेळेपूर्वीच सिलिंडर बुक करणाऱ्यांची संख्या वाढल्याने बुकिंग व्यवस्थेवर ताण येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, इंडियन ऑइल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी सिलिंडर बुकिंगच्या विविध पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. आयव्हीआरएस, मिस्ड कॉल, व्हॉट्सॲप, मोबाईल ॲप्लिकेशन, ओएमसी पोर्टल तसेच पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या डिजिटल माध्यमातूनही बुकिंग करता येणार आहे. ग्राहकांनी नियमानुसार ४५ दिवसांच्या कालावधीतच सिलिंडर बुक करावे, असेही सांगण्यात आले आहे.

सिलिंडर संदर्भात कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी तालुका पातळीवर तहसीलदार कार्यालयाशी किंवा जिल्हा पातळीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपसंचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्यास किंवा चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास ०८३१-२४०७२८२ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.