बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून सिंगल विंडो अर्थात एक गवाक्ष सुविधा सुरू करण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पासून शहरातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असून, त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी, अग्निसुरक्षा, पोलीस परवानगी यासह विविध विभागांकडून घ्याव्या लागणाऱ्या मंजुरीसाठी वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीही बेळगाव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सिंगल विंडो केंद्रांची सुविधा देण्यात आली होती. पोलीस विभागासह महानगरपालिका, हेस्कॉम, अग्निशमन दल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित परवानगी प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

गणेशोत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच गणेश विसर्जन मिरवणुकांचे नियोजन यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित सिंगल विंडो केंद्राशी संपर्क साधून आवश्यक त्या परवानग्या वेळेत पूर्ण करून घ्याव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. विविध विभागांच्या मंजुरीची प्रक्रिया एकाच ठिकाणी होत असल्याने मंडळांना वेळेची बचत होऊन परवानग्या घेणे अधिक सोपे होणार आहे.

गणेशोत्सव शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन आणि तयारी सुरू केली आहे.