- दुसरा डोळा वाचवण्यासाठी मदतीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
भारत-वेस्टइंडिज क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाक्यांच्या आतषबाजीत एका तरुण कार्यकर्त्याचा डोळा निकामी झाल्याची दुर्दैवी घटना भारतनगर परिसरात घडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दुसरा डोळा वाचवण्यासाठी आणखी शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याने त्याच्या मदतीसाठी परिसरातील कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
शिवा नारायण लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली, शहापूर) असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे. नवी गल्लीचा रहिवासी असला तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून भारतनगरमधील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तो सक्रियपणे सहभागी होत असल्याने परिसरात त्याची ओळख आहे. रविवार दि. १ मार्च रोजी रात्री भारत-वेस्टइंडिज क्रिकेट सामना पाहिल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना काही जणांनी फटाक्यांची आतषबाजी केली. याचवेळी झालेल्या अपघातात शिवाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी त्याचा उजवा डोळा निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डावा डोळा वाचवण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी मोठ्या खर्चाची गरज असल्याचे समजते.
भारतनगरचा लंबोदर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शिवा हा कार्यकर्ता आहे. त्याच्या या संकटाच्या वेळी परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. लहान कौलारू घरात तो आपल्या वृद्ध आईसोबत राहतो. दोन बहिणींचे लग्न झाले असून त्या आपापल्या सासरी आहेत. आईचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शिवा दिवसभर चिकन दुकानात काम करतो, तर कधी रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावतो.
आता त्याचा किमान एक डोळा तरी वाचवण्यासाठी उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिसरातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.







