- बीम्स हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या बीम्स रुग्णालयात एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीने रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
मूळची कारवार येथील सना शेख नावाची एक तरुणी स्वतःला पदव्युत्तर शिक्षणाची विद्यार्थिनी असल्याचे सांगून रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्ड आणि ओपीडी विभागात फिरून वैद्यकीय सेवा देत होती. काहीवेळा कर्मचाऱ्यांना संशय आल्यावर तिने बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांचे नाव घेऊन त्यांना धमकावले, असा आरोप आहे.
दरम्यान रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थीनीला रंगेहाथ पकडले. ही बाब तात्काळ बीम्स हॉस्पिटलचे सर्जन आणि आरएमओ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. विद्यार्थीनीची चौकशी केली असता, ती दुसऱ्या खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत असल्याची समजते. रुग्णालयातील एका विभागप्रमुखाच्या मदतीने ती हे कृत्य करत असल्याचे माहिती मिळाली आहे.
मात्र बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी या घटनेबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. एकंदरीत या घटनेमुळे बीम्सच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.