- बेळगाव शहराच्या दोन्ही भागात युनिट : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे ५६०० मेट्रिक टन कचरा रोज तयार होत आहे. या कचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक पद्धतीचा आधार देण्यासाठी आणि प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
सुवर्णविधान सौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दोड्डाबल्लापूर मतदारसंघाचे आमदार धीरज मुनिराजू यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बेळगाव शहरात सध्या ८००० टनांहून अधिक कचरा गोळा केला जात असून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात स्वतंत्र वैज्ञानिक युनिट्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या युनिट्समध्ये जैव-मिथेनेशनद्वारे गॅस निर्मिती , घनकचऱ्यापासून खत उत्पादन, सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर, कचऱ्यापासून वीज निर्मिती अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
कचरा व्यवस्थापनाच्या या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही शिवकुमार यांनी दिले.







