- शहापूर येथील श्रीराम मंदिरात जनजागृती बैठक
- मूक सायकल फेरीत मोठ्या सहभागासाठी प्रयत्न
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिन’ पाळण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला आहे. यानिमित्ताने जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी समितीतर्फे शहापूर येथील गाडे मार्गावरील श्रीराम मंदिरात कार्यकर्त्यांची जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली होती.
बेळगावचे माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असल्याचा आरोप करण्यात येणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. तसेच १ नोव्हेंबर रोजी शांततापूर्ण मार्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन काळा दिन पाळण्याचा निर्णय उपस्थितांनी घेतला.
या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नेताजी जाधव, राजेंद्र बिरजे, महादेव पाटील आणि युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय प्रशांत भातखांडे, श्रीकांत कदम, गुंडू कदम, किरण हुद्दार, शेखर तलवार, सूरज चव्हाण, सागर पाटील, सुनील बोकडे, विलास लाड, रमेश चौगुले, विक्रांत लाड, सुधीर कलकुंद्रीकर, चंदन भगाने, महेश उत्सुकर, प्रथमेश मिरजकर आणि विजय कणबरकर यांची उपस्थिती होती.
- मूक सायकल फेरीत सहभाग वाढविण्यावर भर
१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागात जनजागृती मोहीम तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला. शांततापूर्ण मार्गाने काळा दिन पाळून सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.








