• पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सवामुळे पुढे ढकललेली ईद – ए – मिलाद मिरवणूक आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रविवारी होत असल्याने, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात उद्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त नारायण बरमणी यांनी दिली.

बेळगावात गणेशोत्सवामुळे मुस्लिम बांधवांनी ६ सप्टेंबर रोजी होणारा ईद मिलाद सण साजरा केला असला तरी, मिरवणूक १४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. यानुसार, उद्या सिरत समिती आणि अंजुमन संस्थेच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरात उडून ईद-ए-मिलाद मिरवणूक निघेल. शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. उद्या सकाळी एक मिरवणूक पिंपळ कट्टा येथून सुरू होऊन राणी चन्नम्मा सर्कल मार्गे असद खान दर्ग्यापाशी समाप्त होईल. दुसरी मिरवणूक सायंकाळी ४ वाजता अनगोळ येथून सुरू होऊन रात्री ८ पर्यंत असद खान दर्ग्यापाशी पोहोचेल आणि समाप्त होईल. तसेच, उद्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना देखील असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी अतिरिक्त १५०० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे पोलिस उपायुक्त नारायण बरमणी यांनी सांगितले.

“संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्याच्या ईद मिलाद मिरवणूक आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.” असे ते म्हणाले.