- मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते ‘आरोग्य संचारी’ योजनेचा शुभारंभ
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील डोंगरदऱ्यातील व रस्त्यांअभावी दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना थेट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आरोग्य संचारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव येथील सुवर्णविधानसौध परिसरात फिरत्या आरोग्य पथकांच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या योजनेअंतर्गत एकूण ८१ फिरती आरोग्य वाहने राज्यभर सेवा देणार असून , त्यापैकी उत्तर कर्नाटकासाठी ४१ तर दक्षिण कर्नाटकासाठी ४० वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या माध्यमातून आतापर्यंत आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.
कार्यक्रमात आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी प्रास्ताविक करताना, दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना तात्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच ही योजना आखण्यात आल्याचे स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “आजपर्यंत ज्यांना आरोग्य सेवा मिळू शकली नाही, अशा प्रत्येक घटकापर्यंत सरकार पोहोचणार आहे. आरोग्य संचारी योजना ही सर्वसामान्यांच्या हिताची योजना असून तिचा लाभ नागरिकांनी घ्यावा.”
गरीब, वनवासी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि राज्यातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, हेच सरकारचे मुख्य ध्येय असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री यांनी केला.








