बेळगाव / प्रतिनिधी
एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी (खुर्द) जवळ मार्कंडेय नदीत घडली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्या युवकाचा शोध सुरू आहे. कंग्राळी गावातील सचिन माने या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. नदीत उडी मारण्यापूर्वी त्याने एका व्यक्तीशी फोनवर संभाषण केल्याची माहिती समोर आली आहे. सचिन माने नदीत पडताच दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली आणि प्लास्टिकची वस्तू फेकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या युवकाने ती वस्तू पकडली नाही आणि तो नदीच्या प्रवाहात वाहत गेला. ही घटना एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. माहिती मिळताच एपीएमसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पाहणी करून शोधकार्य सुरू केले आहे.