बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.विनोद गायकवाड यांना कामेरी येथील श्री शिवाजी वाचनालयाचा “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार त्यांना 18 जानेवारी रोजी ईश्वरपूर येथे होणाऱ्या चौथ्या मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलना प्रसंगी वितरित करण्यात येणार आहे.

डॉ. विनोद गायकवाड यांच्या समग्र साहित्य सेवेबद्दल आणि मराठीच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे. रविवारी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील हे आहेत. श्री विश्वास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. गायकवाड यांना दिला जाणार आहे.

आजवर 59 कादंबऱ्यांचे लेखन करणाऱ्या डॉ. विनोद गायकवाड यांची साठावी कादंबरी “दैवजात दुःखे भरता” ही रामायणावर आधारित असून नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यांच्या नावावर 4 कथासंग्रह ,10 समीक्षा ग्रंथ आणि सहा नाटके असून त्यांच्या अनेक कादंबऱ्यांची भाषांतरे कन्नड, इंग्रजी ,हिंदी, तामिळ , गुजराथी व कोकणी भाषेमध्ये झाली आहेत. या पुरस्काराबद्दल डॉ. गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.