- सणासुदीच्या खरेदीने व्यापाऱ्यांमध्ये समाधान
- दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील मुख्य बाजारपेठ असलेल्या बेळगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील खेड्यांची एकमेव बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव बाजारपेठेत आता दिवाळीच्या खरेदीची गर्दी वाढू लागली आहे.
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाला यंदा शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसने प्रारंभ झाला आहे. आज शनिवारी आठवडी बाजारा दिवशी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मारुती गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली या भागात नागरिकांची गर्दी होती. दरम्यान महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाले होते.

आकाश कंदील, लायटिंगच्या माळा, फराळ, फराळाचे साहित्य, उटणे, मिठाई इ. मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळी सणाचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवशी नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी आतापासूनच शोरूममध्ये ग्राहकांची बुकिंगसाठी गर्दी होती. याशिवाय सोन्याच्या दरात वाढ होऊनही सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफी पेढ्याही ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. दिवाळी नंतर लागलीच लग्नसराईला सुरुवात होते यानिमित्ताने दिवाळीचे औचित्य साधून नवीन कपडे खरेदीलाही नागरिकांनी प्राधान्य दिले.


साड्या आणि तयार कपड्यांच्या बाजारपेठांनी अलीकडे चांगलाच लौकिक मिळवला आहे. विविध ठिकाणाहून आलेल्या कापडाची खरेदी करण्यासाठी बेळगाव सह आसपासच्या परिसरातून नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत. परिणामी बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याने विक्रेत्यांमध्ये समाधान आहे. तसेच उद्या रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेतील खरेदीमुळे मोठी उलाढाल होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.