बेळगाव / प्रतिनिधी

सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अवघे सहा दिवस उरले असून पूर्वतयारी जोमात सुरू झाली आहे. या तयारीचा आढावा आज जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणीद्वारे घेतला.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागीय अधिकाऱ्यांनी अधिवेशन परिसराची पाहणी केली.

अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने, सर्किट हाऊस यांसह अंदाजे ३,००० खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून ७०० वाहने तैनात राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे ७ ते ८ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

खास उत्तर कर्नाटकच्या पारंपरिक शैलीतील भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ४.५ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या उद्यान व कारंज्याचे लोकार्पण अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून उत्तर कर्नाटकच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व दुष्काळ निवारणावर सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे.

अधिवेशन काळात सुवर्णसौधच्या तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू असून निदर्शने व आंदोलनांसाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.