• माधुरी जाधव फाउंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

बेळगाव / प्रतिनिधी

वारा आणि पावसाची पर्वा न करता कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) यांनी आपल्या मातोश्री श्रीमती. वासंती रामा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच ब्लॅंकेटचे वितरण केले.

बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला असून थंड वारे वाहू लागले आहेत. मात्र पावसासह थंडीच्या लाटेतही सफाई कर्मचाऱ्यांना शहरातील कचरा संकलनाचे काम करावे लागते. तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) यांनी आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे सदर सफाई कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेटचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली.

समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी दाखवलेल्या आपुलकी बद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही त्यांचे आभार मानले.