- शेतकऱ्यांचे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले.
परवाना रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीवर झोपून निषेध नोंदवला. “अधिकारी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. आमच्या समस्या व भावना समजून घ्याव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांनी प्रश्न उपस्थित केला, “खासगी ‘जय किसान मार्केट’ पाडण्याचा अधिकार तुम्हाला कुठून आला? सरकारी जमिनींवर झालेले अतिक्रमण आधी हटवा.” त्यांनी आणखी आव्हान दिले की, “बसस्थानकाजवळील अनधिकृत इमारती पाडून दाखवा.”
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, बेळगाव हा कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा असून दोन बाजारपेठांची गरज आहे. “आम्हाला आपले उत्पादन दूरवर नेऊन विकावे लागते, कामगारही मिळत नाहीत,” अशी व्यथा कित्तूर, सौंदत्ती, बैलहोंगल आणि यरगट्टीतील शेतकऱ्यांनी मांडली.
त्यांनी मंत्री शिवानंद पाटील यांना इशारा दिला, “जर खासगी ‘जय किसान मार्केट’ला अधिकृत दुसरी बाजारपेठ म्हणून पुन्हा सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू.”
शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आश्वासन दिले, “या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल.” या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.