• वारीतील कीर्तनानंतर सोडला प्राण

पंढरपूर : प्रसिद्ध कीर्तनकार तसेच अरुणा मध्यम प्रकल्प संघर्ष कृती समिती मुंबईचे सचिव ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज (वय ६०) यांचे शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पंढरपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कार्तिकी वारीनिमित्त ते बुधवारी (२९ ऑक्टोबर) मुंबईहून परिवारासह पंढरपूरात दाखल झाले होते. वारीतील कीर्तनसेवा संपवून निवासस्थानी परतल्यावर पहाटे त्यांची अचानक प्रकृती बिघडली. वैद्यकीय मदत मिळण्याआधीच त्यांचे निधन झाले.

महाराजांचे मूळ वास्तव्य मांगवली तिठा परिसरातील आखवणे-भोम-नागपवाडी पुनर्वसन गावठाणात असून, ते मुंबईत संपूर्ण कुटुंबासह स्थायिक होते. त्यांचे वडीलही कीर्तनकार होते आणि त्यांच्या पश्चात दत्ताराम महाराजांनीच हा वसा पुढे नेला. मुंबई ‘बेस्ट’मध्ये उच्च पदावर सेवा करून दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते.

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग ठेवला होता. त्यांच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली आहे. पंढरपूरातून पार्थिव मुंबईत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच भाऊ-बहिणी असा मोठा परिवार आहे.