बेळगाव : मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांनी बेळगाव शिक्षण सोसायटीच्या आवारातील बेळगाव स्पोर्ट्स क्लब च्या प्रशिक्षण केंद्राला धावती भेट देऊन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. सोसायटीचे चेअरमन आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, स्पोर्ट्स क्लबचे कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश पोतदार यांनी बेळगाव क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आणि वाटचालीबद्दल माहिती देऊन जुन्या खेळाडूंच्या योगदानाचा गौरव केला तसेच “दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यासारख्या खेळाडूंना कसे घडविले याचीही माहिती दिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार तर भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे “अशी माहितीही श्री. पोतदार यांनी दिली.

सत्काराला उत्तर देताना दिनेश लाड यांनी खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. खेळाडूंच्या जडणघडणीत पालकांचा व प्रशिक्षकांचा कसा सहभाग असावा याबद्दलही मार्गदर्शन केले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याची स्तूती करून त्यांची वाटचाल गौरवशाली असेल अशी अशा व्यक्ती केली. यावेळी दिनेश लाड यांच्याहस्ते जुने खेळाडू श्री ज्ञानेश्वर श्रेयकर यांचा बॅट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. जोशी, रवी घाटगे, बाळकृष्ण पाटील, विजयकुमार पाटील, विठ्ठल भट्ट ,आनंद करडी या मान्यवरांसह मोठ्या संख्येने युवा खेळाडू व पालक उपस्थित होते.