बेळगाव / प्रतिनिधी

क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बेल्कॉन २०२६’ बांधकाम, प्रॉपर्टी, बांधकाम साहित्य, इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ आज बुधवारी सकाळी सीपीएड मैदानावर रोवण्यात आली.

हे भव्य प्रदर्शन ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार असून, प्रथमच हे प्रदर्शन अत्याधुनिक व सुसज्ज अशा वातानुकूलित शामियान्यात आयोजित करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगळुरूनंतर बेळगावात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य रिअल इस्टेट, इंटिरियर्स व बांधकाम साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

तब्बल एक लाख चौरस फूट क्षेत्रफळात बेल्कॉन व ऑटो एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून, ग्राहकांना एकाच छताखाली स्वप्नातील घरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याची माहिती मिळणार आहे. बेल्कॉन अंतर्गत १५० स्टॉल्समध्ये फ्लॅट, बंगले, विटा, वाळू, स्टील, प्लायवूड, लाइटिंग, गृहसजावट, लिफ्ट आदी विविध बांधकाम व गृहसजावटीशी संबंधित साहित्यांचे प्रदर्शन व माहिती उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर ऑटो एक्सपोमध्ये शंभर स्टॉल्सद्वारे नामवंत कंपन्यांच्या कार, दुचाकी, ई-वाहने, वाहनांचे सुटे भाग, विंटेज कार तसेच स्टंट ड्रायव्हिंगचे आकर्षक सादरीकरण पाहायला मिळणार आहे.

आज झालेल्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाला क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, महेश फगरे, ज्ञानेश्वर सायनेकर, सचिन बैलवाड, यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम, तसेच सचिन कळ्ळीमनी, तनिश कळ्ळीमनी, राजेंद्र मुतगेकर, अभिषेक मुतगेकर, क्रेडाई इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर, दीपा वांडकर, अमर अकनोजी, सीमा हुलजी, सुधीर गड्डे, राजेश माळी, नारायण पवार, वीरेश शेट्टनवर, यश कळ्ळीमनी, गोविंद टक्केकर, आनंद कुलकर्णी, पी. एस. हिरेमठ यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.