- उद्या रविवारी शहर विकासावर ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्ह
बेळगाव / प्रतिनिधी
रिअल इस्टेट, बांधकाम आणि शहर विकासाचे भविष्य एकाच छताखाली मांडणाऱ्या क्रेडाई बेळगाव आयोजित ‘बेल्कॉन’ प्रदर्शनाला बेळगावकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचा उद्या रविवार शेवटचा दिवस असून, यानिमित्ताने बेळगावच्या सर्वांगीण विकासावर मंथन करणारे ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्ह (चर्चासत्र) आयोजित करण्यात आले आहे.
नामवंत बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, गृहसजावट साहित्य उत्पादक तसेच अग्रगण्य वित्तीय संस्थांच्या सहभागामुळे बेल्कॉन प्रदर्शन शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. घर खरेदीस इच्छुक नागरिकांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असून, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना आपले प्रकल्प मांडण्यासाठी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत आहे. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उद्या रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ उर्फ राजू शेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. बेळगावमध्ये प्रथमच अशा स्वरूपाचे व्यापक विचारमंथन होत असून, यामधून मांडले जाणारे प्रस्ताव आणि सूचना शहराच्या भविष्यातील विकासासाठी दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बेल्कॉन प्रदर्शनात निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांची सविस्तर माहिती उपलब्ध असून, परवडणारी घरे, आधुनिक सुविधांनी युक्त प्लॉट्स आणि गुंतवणुकीसाठी योग्य प्रकल्पांची माहिती एका छताखाली मिळत असल्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री या भव्य प्रदर्शनाची सांगता होणार आहे.







