- पालकमंत्र्यांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम आणि अंतर्गत सजावट (इंटिरियर) प्रदर्शन ‘बेलकॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्रेडाई बेळगाव’तर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता क्लब रोडवरील सीपीडी मैदानावर होणार आहे. घराच्या स्वप्नापासून ते सजावटीपर्यंतची सर्व आधुनिक दालने एकाच छताखाली या निमित्ताने नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.
‘क्रेडाई बेळगाव’तर्फे आयोजित या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते संपन्न होईल. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
या उद्घाटन समारंभाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि क्रेडाई कर्नाटकचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उत्तर कर्नाटकातील गृहनिर्माण क्षेत्र, बांधकाम साहित्य, फर्निचर आणि इंटिरियर या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती देणारे हे एक अग्रगण्य व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सचिव व इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर आणि खजिनदार सुधीर पानारे यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्याला शहर आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









