• यावर्षी पहिल्यांदाच वातानुकूलित व्यवस्था : ऑटो एक्स्पोचेही आयोजन

बेळगाव / प्रतिनिधी

स्वप्नातील घर साकारण्यासाठी क्रेडाई बेळगाव आयोजित बेलकॉन ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. क्लबरोड येथील सीपीएडच्या प्रशस्त मैदानावर प्रदर्शन भरविले जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असल्यामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील अनेक नामांकित ब्रँड यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात दिली.

घरासाठी लागणारे सर्व साहित्य एका छताखाली बेलकॉन प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. प्रत्येक स्टॉलसाठी प्रशस्त जागा दिली आहे. त्यामुळे नागरिकांना स्टॉलवर माहिती घेणे सोयीचे होणार आहे. स्टील, सिमेंट, फर्निचर, इंटेरियर, प्रॉपर्टी, गृहकर्ज यांचे १४० क्रेडाईचे स्टॉल आहेत. तर ऑटो एक्स्पोचे १०० स्टॉल असणार आहेत. नवनवीन वाहने व त्यांच्या विषयी माहिती यामध्ये मिळणार आहे.

  • स्वप्नातील घर बांधण्यासाठी बेलकॉन प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार

अध्यक्ष युवराज हुलजी म्हणाले, नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी बेलकॉन प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. फ्लॅट, खुले प्लॉट, इंटेरियर, घराचे फर्निचर या विषयाची संपूर्ण माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील नामवंत ब्रँड आपले उत्पादने प्रदर्शनात मांडणार असल्याने नागरिकांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

  • माहिती पुस्तिकेचे प्रकाशन :

राजेंद्र मुतगेकर म्हणाले, क्रेडाई बेळगावची २००८ पासून सुरुवात झाली. ग्राहकांमध्ये ग्राहक व बिल्डर, डेव्हलपर यांच्यामध्ये विश्वासाचे नातं तयार केलं. बेळगावच्या मास्टर प्लॅनमध्ये क्रेडाईचे महत्त्वाचे योगदान आहे. ५० हजारहून अधिक ग्राहक भेट देतील अशी अपेक्षा आहे. चैतन्य कुलकर्णी, सुधीर पनारे यांनी इव्हेंटबद्दल माहिती दिली. सर्व प्रायोजकांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष युवराज हुलजी, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सचिव सुधीर पनारे, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, यश इव्हेंटचे प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रेडाईचे माध्यम प्रतिनिधी सचिन बैलवाड यांनी केले.