बेळगाव / प्रतिनिधी
कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराच्या मानकरी कॉम्रेड अमरजीत कौर या श्रमजीवी महिला व कष्टकरी जनतेच्या नेत्या आहेत. कम्युनिस्ट पक्षप्रणित आयटक कामगार संघटनेच्या त्या राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच जागतिक कामगार महासंघाच्या उपाध्यक्षा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाच्या सदस्या आहेत. ७४ वर्षाच्या अमरजीत कौर या स्वतंत्र भारतातील मध्यवर्ती कामगार संघटनांच्या २०१८ पासून मार्गदर्शक आहेत. विद्यार्थी दशेपासूनच त्या राजकारणात आहेत. १९७९ पासून सात वर्षे त्या अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्या (एआयएसएफ) महासचिव होत्या. या महासंघाच्या दुसऱ्या महिला महासचिव होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १९९९ ते २००२ त्या भारतीय महिला महासंघाच्या महासचिव होत्या. आयटकच्या राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांनी १९९४ ते २००७ पर्यंत काम केले. विद्यार्थी असताना १९७२ साली दिल्लीत झालेल्या पक्षाच्या महागाईविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल दहा दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
- कार्यक्रमाचे पाहुणे विष्णू जोशिलकर :
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर हे मूळचे चंदगड तालुक्यातील किणी गावचे असून भूगोल व शारीरिक शिक्षण विषयात दुहेरी पदवी संपादन केली आहे. १९८५-८६ मध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्याच वर्षी त्यांना श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्य नंतर १९८८ साली शाहू पुरस्काराचे ते मानकरी ठरले. १९७६ पासून सलग तीन वर्षे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आणि १९८०, १९८२, १९८६ व १९८७ असे चार वेळा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्राविण्य मिळवले. तसेच शिवाजी विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत तीनवेळा व अखिल भारतीय विद्युत मंडळ कुस्ती स्पर्धेत सहा वेळा प्राविण्य मिळवले आहे. कुस्तीबरोबरच त्यांनी गोळाफेक व भारतोलक स्पर्धेतही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पदके मिळविली आहेत. तालीम या चित्रपटात तसेच झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वस्तादाची भूमिका केली आहे. राज्य वीज कामगार संघाचे ते सचिव आहेत. तसेच पद्मश्री रणजित देसाई पत संस्थेचे संस्थापक आहेत. २०२० साली आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब कोल्हापूरचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.








