• कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात कार खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मलीकवाड येथील काही नागरिक कारमधून घटप्रभाच्या दिशेने जात होते. कब्बूर टोलनाक्याजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खोल खड्यात जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत राजेंद्र शंकर पाटील (वय ५०) आणि शीला श्रीपती घाटे (वय ६५, दोघेही रा. मलीकवाड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोहन घाटे आणि प्रदीप घाटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद चिक्कोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.