बेळगाव : चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्चून मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू असून, बुधवारी सकाळी ११ वाजता मंदिराच्या चौकट उभारणीचा कार्यक्रम विधिवत पूजनासह मोठ्या उत्साहात पार पडला.पी.बी.रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आली. प्रारंभी चव्हाट गल्ली परिसरातून चौकट मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अरुण धमुने हे होते. मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

समोरील चौकटीचे पूजन विश्वास धुराजी, विश्वजित हसबे व दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. गाभाऱ्याच्या चौकटीचे दीपप्रज्वलन दिगंबर पवार, सुनील जाधव, चंद्रकांत कणबरकर, जोतिबा नाईक, मोहन किल्लेकर व विनायक मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर चव्हाट गल्लीतील पंच कमिटी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘चौकट पूजन’ सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक तसेच होम-हवन करण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात चौकटीचे पूजन करण्यात आले.

या मंगलप्रसंगी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी व सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ‘व्यंकटेश स्तोत्र’ आणि ‘गोविंदा-गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. चव्हाट गल्लीतील परंपरेनुसार चौकटीला गंध-अक्षता लावून व फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. हा सोहळा मंदिराच्या पुढील बांधकामाची नांदी मानला जातो. सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिराच्या ट्रस्टतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व भाविकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला श्री व्यंकटेश मंदिर पंच कमिटी अध्यक्ष अरुण धमुने, लक्ष्मण धमुने, चंद्रकांत घगणे, राजाराम धमुने, मोहनसिंग टिंबरे, प्रकाश धमुने, प्रतापसिंह वंटमुरी, दिगंबर धमुने, गजानन शंकपुरे तसेच भजनी मंडळाचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.