• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
  • चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचारसभा

चंदगड / प्रतिनिधी

जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १५० किमी अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यासाठी तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार असून, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखडाही लवकरच मंजूर केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजय घाडगे, अंबरिश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे चंदगडसाठी कोरा बेरर चेक” :

चंदगड विधानसभेचा शाश्वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासाठी एक ‘कोरा बेरर चेक’ असून त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम नक्की होणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चंदगड नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंदगडसाठी हवा तितका निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.चंदगड हे गोवा आणि कर्नाटक सीमेवरचे शेवटचे टोक असले तरी ते महाराष्ट्राचे प्रवेशद्वार देखील आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करणे आमची जबाबदारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

  • चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज शहरांचा चेहरा मोहरा बदलणारं :

विकास व्हायचा असेल तर सत्तेत आपल्या विचारांचे लोक असावे लागतात. त्यासाठी चंदगड, आजरा नगरपंचायत व गडहिंग्लज नगरपरिषदेवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करून चंदगड,आजरा नगरपंचायत व गडहिंग्लज नगरपरिषदेवर आमच्या महायुती आणि आघाडीला सत्ता द्या असे आवाहन त्यांनी केले.  विकास निधी मिळवण्यासाठी मी सदैव उभा आहे, चंदगडसह आजरा, गडहिंग्लज शहरांचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • ‘शक्तीपीठ’चे महत्त्व फक्त आमदार शिवाजीराव पाटील यांनाच समजले :

महामार्ग आणि रस्त्याचे महत्त्व खूप कमी लोकांना समजते. त्यात आमदार शिवाजीराव पाटील आहेत, ज्यांना त्याचे महत्व समजले. त्यामुळेच त्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चाचं काढला. त्यामुळे शक्तीपीठ चंदगडमधून वळवून घेतला. त्या माध्यमातून चंदगडमध्ये लॉजिस्टि्क पार्क निर्माण करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाबळेश्वर आणि माथेरानपेक्षा चंदगडची निसर्गसंपन्नता अधिक असल्याचे सांगून येथील पर्यटन क्षेत्राला सरकारी पातळीवर विशेष चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजना जोपर्यंत आपण मुख्यमंत्री आहोत तोपर्यंत बंद होणार नाही, तसेच हेरे सरंजामी प्रश्न मार्गी लावून ५० गावांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या सभेत आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की चंदगड नगरपंचायतीसाठी १९३ कोटींचा निधी मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. चंदगडच्या तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, आयुष्यमान आरोग्य सेवा, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज व क्रीडा संकुल उभारण्याचे प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठबळाने हे सर्व प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की देशातील ८० कोटी जनतेला मोफत अन्न, १० कोटींना शौचालय, १२ कोटींना मोफत गॅस, २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजना – भाजप सरकारने कुठेही जातीयता पाहिली नाही, भ्रष्टाचार केला नाही. विकास हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या या स्वच्छ सरकारच्या पाठीशी जनतेने ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या सभेला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रास्ताविक दिग्विजय देसाई यांनी केले.