बेक्कीनकेरे : तब्बल ६६ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चलवेनहट्टी येथील महिलांनी माहेरच्या बेक्कीनकेरे महालक्ष्मी मातेच्या चरणी ११ तोळ्यांचा चांदीचा राणीहार अर्पण करून भक्तीभाव व्यक्त केला.
चलवेनहट्टी आणि बेक्कीनकेरे या दोन्ही गावांमध्ये जुने वैवाहिक संबंध असून अनेक महिला बेक्कीनकेरेहून चलवेनहट्टी येथे सासरी गेल्या आहेत. यात्रेचे औचित्य साधत या महिलांनी एकत्र येऊन माहेरच्या देवीला चांदीचा दागिना भेट दिला आणि देवीची कृपादृष्टी सदैव राहावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी धनगरी ढोलांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत दागिन्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नागनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक महालक्ष्मी मंदिरात दाखल झाली. महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभाग नोंदवला होता. मंदिरात पोहोचल्यानंतर यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणीहार स्वीकारून तो महालक्ष्मीच्या मूर्तीला परिधान केला.
दागिना अर्पण करणाऱ्या सर्व महिलांचा यात्रा उत्सव समितीच्या वतीने नारळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी रेणुका अशोक पाटील, लीला हुंदरे, राधिका पाटील, नंदा पाटील, लक्ष्मी सनदी, सुनिता पाटील, मुक्ता हुंदरे, कविता पाटील, प्रियंका हुंदरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








